शपथविधीदरम्यान फिरणारं ते जनावर ‘बिबट्या’ की ‘मांजर’? राष्ट्रपती भवनातील जनावराचा व्हिडीओ व्हायरल

देशात NDA सरकार आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात तिसऱ्या टर्मसाठी शपथ घेतली. या समारंभासाठी विविध देशांचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर, उद्योगपती आणि चित्रपट कलाकारांसह 8,000 पाहुणे उपस्थित होते. पण सोशल मीडियावर चर्चा आहे ती कॅमेऱ्यात कैद झालेला एक विना आमंत्रण पोहोचलेल्या पाहुण्याचं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजप खासदार दुर्गा दास उईके हे शपथविधी पूर्ण केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन करत असताना मागे एक मोठ्या मांजरीसारखा प्राणी दिसत आहे.

तो प्राणी बिबट्या होता का? की एक मांजर? किंवा कुत्रा? राष्ट्रपतींच्या राजवाड्यात कोणता प्राणी अचानकपणे फिरताना दिसला? याच्या व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.

‘हे एडिट केले आहे की काय? हे कोणाच्या लक्षात कसे आले नाही. मोठ्या मांजरासारखे दिसते आहे’, असं एका युझरनं म्हटलं आहे. ‘शेपटी आणि चालण्यामुळे एक बिबट्या वाटतो आहे. लोक खरोखर भाग्यवान होते की ते शांतपणे पार पडले’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

आणखी एक युजर म्हणत आहे की, ‘कदाचित हे मोठं पाळीव मांजर असेल’.

राष्ट्रपती मुर्मू यांनी 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री (MoS) आणि स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री यांच्यासह 72 सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर या प्रमुख व्यक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून कायम आहेत. नव्या मंत्रिमंडळात NDA आघाडीतील 11 मंत्र्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली.