Bharat Jadhav- ख्यातनाम ‘सही रे सही’ या नाटकावर अभिनेता गोविंदा हिंदी सिनेमा करणार होता! तो सिनेमा का होऊ शकला नाही, वाचा सविस्तर

मराठी नाट्यसृष्टीतील अभिनेता भरत जाधव म्हणजे विनोदाचा हरहुन्नरी एक्का. भरत जाधवच्या अनेक नाटकांनी आणि चित्रपटांनी आपल्याला पोट धरून हसवलं. भरत जाधवचे ‘अधांतर’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘सही रे सही’ यासारखी नाटकं ही आजही मराठी रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘सही रे सही’ हे नाटक तर आजही रंगमंचावर तितकंच फ्रेश आणि ताजंतवानं असलेलं नाटक आपल्याला बघायला मिळत आहे. ‘सही रे सही’ मधील डुप्लिकेट पात्रांच्या जुगलबंदीने आजही प्रेक्षकांना प्रश्न पडतो, नेमका खरा भरत जाधव कुठला? आज २३ वर्षांनंतरही ‘सही रे सही’ या नाटकाची गंमत मात्र कमी झालेली नाही, हेच या नाटकाच्या यशाचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही.  याच ‘सही रे सही’ वर हिंदी चित्रपट होणार होता मग तो का झाला नाही याबद्दल नुकतंच भरतने भाष्य केलं. अमोल परचुरे यांच्या कॅचअप या पाॅडकास्ट मध्ये बोलताना भरतने हा किस्सा सांगितला.

भरत जाधव याबाबत म्हणाला, “सही रे सहीचा प्रयोग लंडनमध्ये होता. आम्ही सर्व लंडनच्या फ्लाइटमध्ये बसलो होतो. तोपर्यंत ‘सही रे सही’ हे नाटक खूप हिट झालं होतं. त्याच फ्लाइटमध्ये अभिनेता गोविंदा होता. त्याला कळलं की आम्ही त्या फ्लाईटमध्ये आहोत. गोविंदा आम्हाला येऊन भेटला. त्याने आमच्या अभिनयाचे कौतुक केले. केदारलाही भेटला आणि अशाच आमच्या गप्पा सुरु होत्या. या गप्पांदरम्यान गोविंदा आम्हाला म्हणाला, मी डेविड धवन यांना ‘सही रे सही’ नाटकाविषयी सांगितलं आहे, आणि यावर आम्ही हिंदी चित्रपट करण्याच्या विचारात आहोत. असं म्हणून गोविंदाने केदारचा आणि माझा नंबर घेतला. परंतु काही दिवसांनी गोविंदाने केदारला फोन केला आणि म्हटलं की, आम्ही तुमच्या ‘सही रे सही’ नाटकावर हिंदी चित्रपट करण्याच्या विचारात आहोत. पण तुमच्या नाटकाचे निर्माते मात्र तयार नाहीत.”

भरत जाधव सध्याच्या घडीला सही रे सही आणि मोरूची मावशी या नाटकांमध्ये व्यस्त आहे. या नाटकांचे प्रयोग करण्यासाठी भरत कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करतात. त्यामुळे कोल्हापूरला शिफ्ट होण्यासंदर्भातही त्यांनी या पाॅडकास्टमध्ये खुलासा केला आहे.