खडीने भरलेल्या हायवाने दुचाकीस्वारांना उडविले…

बांधकामासाठी खडी घेऊन जाणाऱ्या एका हायवा ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या मामा- भाच्याला उडविले. त्यात भाचा फैजान अब्दुल रहेमान शेख (रा. शहागंज) हा चिरडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता काल्डा कॉर्नर ते रोपळेकर चौकदरम्यान घडली. शहरात अवजड वाहनांना बंदी असताना अपघातास कारणीभूत ठरलेल्या हायवाचालकाविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मस्जीद परिसरात राहणारे सलीम गणी शेख (28) हे त्यांचा भाचा फैजान शेख याच्यासोबत स्कुटी (क्र. एचएच 20 जीयू 9149) वरून अमरप्रीत चौकातून दर्थ्यांकडे जात होते. याच रस्त्यावरून हायवा ट्रक क्र. एमएच 20 ईएल 4723 देखील जात होता, हायवा ट्रकचालकाने समोरून जाणाऱ्या स्कुटीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार फैजान शेख हा हायवा ट्रकच्या मागील टायरखाली आल्याने जागीच ठार झाला. तर सलीम शेख हा बाजूला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व नागरिकांनी जखमी सलीम ,शेख व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या फैजान शेख यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी फैजान शेख याला मृत घोषित केले. पोलिसांनी अपघातग्रस्त हायवा ट्रक तसेच चालक राजेंद्र कचरू पेटारे याला ताब्यात घेतले. सलीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मामाकडे वेल्डिंगचे काम शिकण्यासाठी आला होता फैजान

फैजान शेख मूळचा माहिम, मुंबई येथील रहिवासी होता. तो गेल्या दोन वर्षांपासून मामा सलीम शेख यांच्याकडे राहत होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मामा सलीम शेख यांच्याकडे वेल्डिग व्यवसायाचे काम शिकत होता. शनिवारी मामा आणि भाचा हे दोघे बीडबायपास येथील एका साईटवर काम करण्यासाठी जात होते, अशीही माहिती सलीम शेख यांच्या नातेवाईकांनी दिली.

पोलीस आयुक्तालयासमोरच तीन चिमुकल्यांना उडविले

पोलीस आयुक्तालयाच्या समोर एका अज्ञात कारचालकाने तीन भिक्षुक मुलांना उडवून पसार झाल्याची घटना गुरुवारी, 28 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. या अपघातात आनंद भगवान जाधव (4), भाग्यश्री भगवान जाधव (9) व गौतम भगवान जाधव (7) हे तीन चिमुकले जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची नोंद सिटीचौक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फरार कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

हायवा शहरात आलाच कसा?

शहरात जड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना हा हायवा ट्रक शहरात आला कसा? असा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, हा हायवा ट्रक एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा असून बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी परवानगी घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली