
हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त महाशिवरात्रीला म्हणजे बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भागोजीशेठ कीर स्मृती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती सोहळय़ानिमित्त बुधवारी सायंकाळी 5 वाजता सेंच्युरी बाजार बेंगाल केमिकल नाका, वरळी ते भागोजीशेठ कीर स्मृतिस्थळ, दादर चौपाटी यादरम्यान शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता अभिवादन सभा होईल. पेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज रणजीत सावरकर, भागोजी कीर यांचे वंशज अंपुश कीर, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. जयप्रकाश पेडणेकर, नविनचंद्र बांदिवडेकर, विनोद चव्हाण या सोहळय़ाचे निमंत्रक आहेत. नागरिकांनी मोठय़ा संख्येने या सोहळय़ाला उपस्थित राहावे, असे आवाहन भागोजीशेठ कीर स्मृती समितीचे अध्यक्ष किशोर केळुसकर यांनी केले आहे.
भागोजीशेठ कीर यांचा जन्म 4 मार्च 1869 रोजी रत्नागिरीजवळ पेट किल्ला या खेडय़ात झाला. 12 व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. पुढे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते उद्योजक पालनजी मिस्त्री यांचे कॉण्ट्रक्टर, सहकारी. नंतर कंपनीचे भागीदार झाले. हिंदू धर्मातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी मुंबई शहरात जागेची आबळ होती. त्यावेळी भागोजीशेठ यांनी दादर येथे जागा घेऊन स्मशानभूमी बांधून दान केली. रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले. देश पारतंत्र्यात होता अशा वेळी हिंदुस्थानी स्वातंत्र्यदेवतेचे अस्तित्व असलेले हे देशातील पहिले राष्ट्रीय मंदिर भागोजींनी बांधले. प्रतिपूल जातीव्यवस्थेला गाडून टाकण्यासाठी स्वराज्य सहभोजनाला सुरुवात केली.