
कर्जबाजारी झाल्याने देणेकऱ्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी सराफानेच चुलतभावाच्या मदतीने पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोनजणांना अटक केली होती. चौकशीत सराफी पेढीच्या मालकाच्या चुलतभावाला अटक केली आहे. राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (वय 40), श्याम शिंदे (वय 37, दोघे रा. लांडेवाडी, भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
धायरीतील काळूबाई चौक परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’ सराफी पेढीवर मंगळवारी भरदिवसा दरोडा पडला होता. पेढीचा मालक आणि कर्मचाऱ्याला खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळ्यांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले होते. झटापटीत चोरट्यांकडील पिस्तूल सराफी पेढीत पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिस्तूल ताब्यात घेतले. तेव्हा ते पिस्तूल खेळण्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजनुसार माग काढून दोघांना भोसरीतून ताब्यात घेत अटक केली होती.चौकशीत ज्वेलर्स मालकानेच चुलतभावाला पेढीवर दरोडा टाकण्यास सांगितले होते. पेढीच्या मालकावर 20 ते 25 लाख रुपयांचे कर्ज होते. देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने दरोड्याचा बनाव रचल्याचे तपासात उघडकीस आले.