
कंपनीच्या डेपोमधून इंधनाने भरलेले टँकर बाहेर नेताना मध्येच थांबवून इंधनाची चोरी केली जात होती. छापा कारवाईत इंधन चोरी करताना सहाजणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
एचपीसीएल व आयओसी या नामांकित कंपनीच्या डिझेल डेपोतून भरलेला टँकर निर्जन ठिकाणी नेऊन टँकरमधील इंधन चोरणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने आरोपी हे तीन टँकरमधून डिझेल चोरी करत होते. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून 1 हजार 620 लिटर डिझेल, टँकर असा तब्बल 48 लाख 1 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, रॅकेट चालविणाऱ्या सहाजणांना अटक केली असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
शुभम सुशील भगत (23, रा. थेऊरफाटा), तृषांत राजेंद्र सुंभे (31, रवी केवट) (25, रा. बोरकरवस्ती), विशाल सुरेश गोसावी (30, रा. थेऊरफाटा), किरण हरिभाऊ आंबेकर (31, रा. कदमवाकवस्ती), रोहित कुमार (21, रा. बोरकरवस्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, टँकरमालक श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुंबे आणि डिझेल विकणारा प्रवीण सिंद्राम मडीखांबे यांच्यावर गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कदमवाकवस्ती भागात एचपीसीएल, आयओसी कंपनीचे गोडावून आहेत. येथून टँकरमध्ये डिझेल भरून ते नियोजित मार्गाने पेट्रोल पंपाकडे नेण्यात येतात. मात्र, टँकरवरील चालक आणि इतरजण संगनमताने इंधनचोरी करत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजू महानोर, अंमलदार शिवाजी जाधव, मल्हारी ढमढेरे यांच्यासह पथकाला मिळाली. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांना ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच एसीपी आणि लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील महामार्गाच्या दक्षिणेस असलेल्या रिकाम्या जागेतील पत्र्याच्या रोडमध्ये छापा टाकला. त्यावेळी आरोपी हे इंधन चोरताना आढळून आले. इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने आरोपींकडून इंधन चोरण्यात येत होते. पथकाने त्यांच्याकडून इंधन आणि इतर असा ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहाजणांना अटक केली. तर, इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.