प्रचाराच्या वाहनावर फक्त दोन फूट उंचीचा झेंडा

निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱया फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही; तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

जिह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱया वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही; तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.

फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

नमुना मतपत्रिका छपाई अशी असावी

राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱया उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱया मालकांनी तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवारांचे नाव व त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापण्याबाबत निर्बंध घातले आहेत.