नवी पेठेतील अभ्यासिकेत आग; विद्यार्थ्यांच्या नोट्स, पुस्तके अन् साहित्य जळून खाक

नवी पेठेतील ‘ध्रुवतारा’ नावाच्या अभ्यासिकेत शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने अभ्यासिक बंद असल्याने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र, आगीत विद्यार्थ्यांची पुस्तके, काही विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाईल आणि अभ्यासाचे साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

नवी पेठे ‘ध्रुवतारा’ नावाची अभ्यासिका आहे. शनिवारी सकाळी अभ्यासिकेतून धूर बाहेर येऊ लागला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. आग लागली तेव्हा अभ्यासिकेत विद्यार्थी नव्हते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, नोट्स, पुस्तके आगीत जळून खाक झाली आहेत. काही विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप देखील

अभ्यासिकेतच होते. शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी क्षमता असलेली ही अभ्यासिका होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे साहित्य आतमध्ये होते. हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत जळून गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.