शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या दिवशी पिंपळगाव शिवारात नाला बंद केल्याने शेतात साचलेल्या पाण्याच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, 12 रोजी सकाळी दिवशी पिंपळगाव येथे उघडकीस आली. अरुण भाऊसाहेब वावरे (58) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दिवशी पिंपळगाव येथील गावाला लागूनच असलेल्या गट क्रमांक 160 मधील शेतात अरुण वावरे हे कुटुंबीयासह वास्तव्यास होते. बुधवारी रात्री घरी आगमन झालेल्या गौरीचे पूजन करून ते नेहमीप्रमाणे कुटुंबीयासह झोपी गेले व गुरुवारी पहाटे पाच वाजता आंघोळ करून त्यांनी देवदर्शन घेतले. त्यानंतर साडेपाच वाजता घराच्या समोर असलेल्या छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लहान भाऊ संजय वावरे यांना आढळून आले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी अरुण वावरे यांना तपासून मयत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. शिल्लेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, दोन बहिणी, सासू, असा परिवार आहे.

अरुण व त्यांचे लहान भाऊ संजय वावरे यांचे दिवशी पिंपळगावच्या जवळच गट क्रमांक 160 मध्ये सामाईक शेत आहे. महामार्गाच्या खालून टाकलेला नालापाईप दुसऱ्या बाजूने दाबल्याने पावसाचे व गावातील वाहून येणारे पाणी वावरे यांच्या शेतात साचत होते हे पाणी त्यांच्या घरापर्यंत आले होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी संजय वावरे यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी 26 जून रोजी पंचनामा केला होता. त्यानुसार तत्कालीन तहसीलदार सतीश सोनी यांनी 3 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यास पत्र लिहून सदरील दाबलेला नालापाईप मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित विभागाने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. परिणामी सततच्या पावसाने शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेती उत्पादनाला देखील फटका बसला होता. प्रशासनाने देखील याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने वैतागलेल्या अरुण वावरे यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.