रुईया कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना पंखा कोसळला; विद्यार्थिनी थोडक्यात बचावली, युवा सेनेने पाहणी करून प्रशासनाला विचारला जाब

माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात एमए फिलॉसॉफीचा वर्ग सुरू असतानाच पंखा कोसळल्याची घटना घडली. अनन्या घाग ही विद्यार्थिनी या दुर्घटनेत थोडक्यात बचावली. तिच्या पालकांनी या घटनेची माहिती शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांना दिली. त्यांच्या सूचनेवरून युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी रुईया महाविद्यालयात जाऊन त्या वर्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकुर यांच्याशीही चर्चा केली. या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाला देऊनही अधिकाऱयांनी गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे प्राचार्यांनी जातीने लक्ष घालून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निवेदन यावेळी युवा सेनेच्या वतीने डॉ. लोकुर यांना देण्यात आले. याप्रसंगी युवा सेनेचे प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिपंत झोरे, विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, महाविद्यालयाचे सीईओ साहेबराव घुले उपस्थित होते.