जालन्यात महापालिकेच्या जलकुंभात मृतदेह आढळल्याने खळबळ

जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विसावा शाळेच्या आवारातील जलकुंभात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसापासून दुर्गंधीयुक्त आणि दूषित येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

दरम्यान, या जलकुंभात त्याच भागात राहणाऱ्या अनिल काकडे नामक इसमाचा मृतदेह असल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.हा इसम चार दिवसांपासून गायब असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या जलकुंभातील पाणी उपसण्याचे काम सुरू असून, मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

जलकुंभात असलेले पूर्ण पाणी खाली झाल्यानंतर जलकुंभ साफ करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. जलकुंभात आढळून आलेल्या इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.