एकीकडे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवण्याचा धडाका मिंधे सरकारने लावला आहे. त्यातच खासगी कंपन्यांनीही गुजरातची वाट धरली आहे. पुण्यातील क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित होत आहे. त्यामुळे जवळपास 400 कर्मचाऱ्यांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.
मुळशी तालुक्यातील धनवेवाडी येथे ही क्रेन कंपनी आहे. रस्ता नसल्याने कंपनी महाराष्ट्रातील प्रकल्प बंद करून गुजरातला जात आहे. मागील बारा वर्षांपासून पुण्याच्या पौड धनवेवाडी रस्त्यावर युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करत होती. या परिसरात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सरकार दरबारी रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकारकडून कंपनीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार विनंती करूनही सरकारने कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कंपनीची गैरसोय होत आहे.
कंपनीत अवजड क्रेन बनवल्या जातात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कंपनीत मोटर ट्रक किंवा कंटेनर येणे खडतर बनले आहे. कंपनीसह स्थानिक नागरिकांनीही रास्ता दुरुस्तीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या मागण्यांनाही प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. सरकारच्या याच अनास्थेमुळे क्रेन कंपनी आपला पुण्यातील प्रकल्प बंद करून गुजरातला स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे.
सरकारच्या पोकळ घोषणा
सरकार एकीकडे उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करीत असल्याच्या घोषणा करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची परिस्थिती पाहता सरकारच्या घोषणा पोकळ असल्याचे सिद्ध होत आहे. परिणामी, खराब रस्ते व अपुऱ्या सुविधांच्या कारणांवरून कंपन्या महाराष्ट्र सोडून चालल्या आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण वाढतेच
पुण्यातील वाहतूककोंडी तसेच इतर प्रश्नांमुळे अनेक आयटी कंपन्यांनी दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांत तब्बल 37 आयटी कंपन्या हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून बाहेर गेल्या. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढते राहिले आहे.