मढ आयलंडमधील बेकायदा बंगले व बांधकामे उच्च न्यायालयाच्या रडारवर आली असून याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने या एसआयटीची स्थापना केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना या एसआयटीच्या प्रमुख असतील. तुमच्या मर्जीनुसार या तपासासाठी पोलीस उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करा, असे आदेश न्यायालयाने अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मीना यांना दिले आहेत.
सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मी गौतम यांनी या तपासावर देखरेख ठेवावी. एसआयटीने या तपासाचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करावा, असेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी यावरील पुढील सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण
मढ आयलंड येथील बेकायदा बांधकामाच्या तपासात दिरंगाई होत असल्याने वैभव ठाकूर व अन्य यांनी अॅड. अभिनंदन वग्यानी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून ही बांधकामे 1964 पूर्वी झाली असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून सीआरझेड नियमांचा बांधकामांना फटका बसणार नाही, असा ठाकूर यांचा आरोप आहे.
तपास अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. या गुह्याच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यास प्रशासनाची काहीच हरकत नाही, असेही अॅड. वेणेगावकर यांनी स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने या एसआयटीची स्थापना केली.