मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या तज्ञांच्या समितीने शिर्डीच्या साई मूर्तीचे थ्रीडी स्पॅनिंग केलं असून, दीड महिन्यानंतर समिती साईबाबा संस्थान प्रशासनाला लेखी अहवाल देणार आहे. साई मूर्तीची अधिक झीज होऊ नये, यासाठी समितीच्या वतीने साईबाबा संस्थानला काही सूचना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साई मूर्तीचे थ्रीडी स्पॅनिंगद्वारे ‘डेटा’ संग्रहित करण्यासाठी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या तज्ञांच्या समितीने शिर्डीत साई मंदिरातील साई मूर्तीचे तीन तासांहून अधिक वेळ थ्रीडी स्पॅनिंग केले आहे. दुपारी पावणे दोन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत हे स्पॅनिंग करण्यात आले असून, यावेळेत साई समाधी मंदिर तीन तास भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. साई मूर्तीची झीज होऊ नये, तसेच भविष्यात आकार बदलून मूर्तीची सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्याने ही पावले उचलली जात आहेत.