
दिल्ली विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल एका 13 वर्षीय मुलाने पाठवला आणि पोलिसांची एकच धावपळ उडाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडल्याची माहिती इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिली. धमकीचा ईमेल आल्यानंतर सर्व पोलीस यंत्रणा अॅलर्ट मोडवर गेली. कसून तपास करण्यात आला.
संपूर्ण विमानतळ पिंजून काढण्यात आला. ईमेलची खातरजमा करण्यात आली. तेव्हा 13 वर्षीय मुलाने हा ईमेल पाठवल्याचे निदर्शनास आले. मुलगा उत्तराखंडच्या पिथोरागड येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि समज देऊन पुन्हा पालकांच्या हवाली केले. या मुलाला पालकांनी अभ्यासासाठी मोबाईल दिला होता. मात्र, त्याने मोबाईलद्वारे ईमेल पाठवला आणि डिलिट केला.