पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या निघालेले 57 वर्षीय व्यावसायिक 16 तासांनी थेट मुंबईत कचराकुंडीजवळ सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. शैलैंद्र कमलाकर साठे असे सदर व्यावसायिकाचे नाव आहे. कचराकुंडीजवळ सापडल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी साठे शुद्धीवर आले. साठे यांच्याकडील सोन्याच्या चैन, पैसे, मोबाईलही गायब आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे जाहिरात, चित्रपट आणि ब्रँडिंग व्यवसाय करतात. सध्या ते पुण्यात कुटुंबासह राहत असून, कामानिमित्त आठवड्यातून किंवा महिन्यातून दोनदा मुंबईला येतात. 14 जून रोजीही व्यवसायानिमित्त ते पुण्याहून मुंबईला येत होते. साठे यांनी सकाळी 10.30 वाजता शिवनेरी बस पकडली. बसमध्ये त्यांच्या शेजारी एक इसम बसला होता. त्यानंतर दुपारी 12.15 च्या सुमारास ते वॉशरुमला जाऊन आले. त्यानंतर शेजारी असलेल्या सहप्रवाशाने त्यांना कॉफीची ऑफर केली. कॉफी प्यायल्यानंतर साठे बेशुद्ध झाले.
दुपारी 1 वाजल्यापासून साठे यांची पत्नी त्यांना फोन करत होती. मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यानंतर बराच वेळ उलटूनही साठेंचा फोन लागत नव्हता. अखेर त्यांच्या पत्नीने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशीही संपर्क साधला. यानंतर चेंबूर आणि गोवंडी पोलिसांशीही त्यांनी संपर्क साधला. पण त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर साठे यांच्या मेव्हण्याने दादर येथे येऊन त्यांचा शोध घेतला असता, दादरमधील स्टेट ट्रान्सपोर्ट स्टँडजवळ कचराकुंडीजवळ साठे बेशुद्धावस्थेत सापडले.
यानंतर साठे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीत आल्यानंतर साठे यांनी माटुंगा पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. दोन सोनसाखळ्या, एक मोबाईल फोन, एक घड्याळ, रोख 9,000 रुपये आणि इतर कागदपत्रे असा एकूण 3.70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 328 आणि 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
दादरमधील स्टेट ट्रान्सपोर्ट स्टँडजवळील फुटेज पाहिले असता बसचे चालक आणि वाहक साठे यांना बसमधून धरुन खाली उतरवताना दिसले. बेशुद्ध अवस्थेतील साठे यांना रुग्णालयात नेण्याऐवजी बस स्टँडजवळील कचराकुंडीजवळ ठेवल्याने बसचे चालक आणि वाहकही अडचणीत आले आहेत. याबाबत योग्य तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करू असे राज्य परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.