राज्यसभेने आज एक विचित्र प्रसंग अनुभवला. विख्यात कायदेतज्ञ व काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाखाली पन्नास हजार रुपयांचे बंडल सुरक्षा कर्मचाऱ्याला सापडल्याची माहिती सभापती जगदीप धनखड यांनी दिल्याने सगळेच अवाक् झाले. या पैशांशी आपला संबंध नसल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सभापतींनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्यसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती धनखड यांनी विरोधी बाकांवरील आसन क्रमांक 222 च्या खाली सुरक्षा कर्मचाऱ्याला पैशांचे बंडल सापडल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर या प्रकरणावरून सभागृहात एकच गदारोळ झाला. तुम्ही कोणाचे एकदम नाव घेऊ शकत नाहीत, असा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.
ते पैसे माझे नाहीत – सिंघवी
अभिषेक सिंघवी यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण दिले. मी राज्यसभेत काल केवळ तीन मिनिटे बसलो, नंतर निघून गेलो. संसदेत मी कधीच पाचशेच्या वर पैसे आणत नाही ते पैसे माझे नाहीत, असे त्यांनी निक्षून सांगितले.
गदारोळ कायम
संसदेच्या दोन्ही सभागृहांत अदानी, संभलच्या मुद्द्यावरून आजही गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. राज्यसभेत थोडेफार कामकाज झाले, मात्र त्यानंतर गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.