महिलांच्या केसदानासाठी सायकल मोहिमेचे आयोजन

हिंदायान 2025 दिल्ली ते पुणे सायकल मोहीमच्या वतीने ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी विग तयार करण्यासाठी महिलांना केसदान (पोनीटेल) करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम 15 ते 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

हिंदुस्थानात सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी 2022 पासून ‘हिंदायान’अंतर्गत दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध शहरांमध्ये सायकल मोहिमा आयोजित केल्या आहेत. ‘हिंदायान’ आयोजक आणि जगप्रदक्षिणा करणारे पहिले हिंदुस्थानी विष्णुदास चापके यांनी हिंदुस्थान सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मदतीने देशात सायकल चालवण्याला (सायकलिंग) प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तीन वर्षांपूर्वी ‘हिंदायान’ वार्षिक सायकल मोहिमेची सुरुवात केल्याचे सांगितले.

‘हिंदायन’च्या तिसऱ्या पर्वासाठी कर्करोगाविषयी जागरूकता ही संकल्पना आहे. त्याअंतर्गत कर्करोगाच्या रुग्णांसाठी केसांचे विग बनवण्यासाठी आम्ही वर नमूद केलेल्या शहरांमध्ये केशदान शिबिरे फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहेत.

उपचार घेत असलेल्या व्यक्तींसाठी विग हे केवळ डोक्यावरील आच्छादनापेक्षा बरेच काही आहे. केस हे चारचौघांसारखे दिसण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि सुंदर दिसण्याचीही संधी आहे. प्रत्येक पॉनीटेल दान करणे हे प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याचे आणि संघर्ष करणाऱ्या बहिणींना आधार देण्याचे प्रतीक असल्याचे चापके म्हणाले.