बाप रे…! ओतूरच्या शेतात पडली 30 किलोंची गार; जमिनीवर तीन फुटांचा खड्डा

जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळ असलेल्या डोमेवाडीत थक्क करणारी घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23) दुपारी आकाशातून एक भलीमोठी गार कोसळली. ही गार सुमारे 30 किलो वजनाची असल्याला अंदाज वर्तविला जात आहे. ही गार पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. डोमेवाडीत बाबाजी बाजगे यांच्या सोयाबीनच्या शेतात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही मोठी गार कोसळली. गार खाली येताना शेजारील शेतात काम करणारे नितीन डुंबरे यांनी पाहिली, गार खाली पडल्यावर फुटली. तेथे साधारण तीन फूट खोलीचा खड्डा पडला. खाली पडलेली गार पाहण्यासाठी बबन भोरे, पंकज डुंबरे, संतोष डुंबरे, तुकाराम डुंबरे, बाबाजी डुंचरे, प्रवीण डुंबरे, अमित भोरे, बाबूराव डुंबरे, रामदास भोरे, बाळू भोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाकाय गारेचा गोळा खाली पडल्यावर त्याचे तुकडे झाले, तरी 25 किलोंचा गोळा तसाच होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके, तलाठी अतुल विभूते, कर्मचारी संदीप राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तोपर्यंत गार वितळली होती. या ठिकाणचा अतुल विभूते यांनी पंचनामा करून त्याचा अहवाल जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांच्याकडे सादर केला.

ढगांमधील तापमान जेव्हा वजा 60 ते 70 पर्यंत घसरते तेव्हा वाफेचे तत्काळ बर्फात रूपांतर होते. हे लहान-लहान गारांचे कण एकमेकांना चिकटले की, मोठ्या आकाराच्या गारा तयार होतात. आर्द्रता एकमेकाला चिकटून त्यातून गारेचा गोळा तयार होतो. यापूर्वी चेंडूएवढ्या आकाराच्या गारा पडलेल्या आहेत.