Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर यावरून पडदा उठला असून आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त म्हणून काम केलेले आहे. शिवाय गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलेले आहे. काही काळासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुखदेखील होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले आहे. महायुती सरकार आल्यानंतर विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली होती. देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता. आता विवेक फणसळकर निवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.