पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले

पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसने साडेसहाशेहून अधिक सुरक्षा रक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन थकविले आहे. या सुरक्षा रक्षकांमध्ये 27 तृतीयपंथी आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी वेतन न मिळाल्याने या सुरक्षा रक्षकांपुढे आर्थिक संकट उभे राहीले आहे. प्रशासनाने कंपनीला दंड ठोठावला असला तरी त्यावर कुठलाच परिणाम होत नसल्याने हे सुरक्षा हवालदिल झाले आहेत.

मुंबईत काम करणाऱ्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेकडे नेमणुकीला असल्याचे दाखवून महापालिकेकडून जवळपास त्यांचे सहा महिन्यांचे वेतन उकळणाऱ्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसकडून महापालिकेने ही रक्कम वसुल केली आहे, तसेच कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ईएसआयचे पैसेही न भरल्याने दंडही वसूल केला आहे. मुंबईतील बड्या नेत्याच्या आशीर्वादाने पुणे महापालिकेत कंत्राट मिळवलेल्या या ठेकेदार कंपनीने आता सुमारे साडेसहाशे कर्मचाऱ्यांचा पगारही थकविला असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांमध्ये २७ तृतीयपंथी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. वेतन मिळाले नसले तरी ही मंडळी इमाने इतबारे काम करीत आहेत. मात्र, वेतन रखडल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. याबाबत सुरक्षा विभागाचे प्रमुख राकेश विटकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘वेतन थकविल्याने कंपनीला दररोज पाच हजार रुपयेप्रमाणे दंड ठोठावला आहे. सातत्याने नोटीस देऊन संपर्क साधला जात आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेले नाही.

ईगल सिक्युरिटीला अभय कोणाचे ?
ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसने पालिकेची फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकारानंतर केवळ दंडात्मक कारवाई केली. फसवणूक झाल्यानंतर महापालिकेने याप्रकरणी गुन्हा दाखल करून या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायला हवे होते. मात्र, बड्या नेत्याच्या आशीर्वादामुळे वरिष्ठ अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत असल्याची चर्चा अधिकारी वर्तुळात आहे.