पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थान कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही ही भीती व्यक्त केली होती. यामुळे पाकड्यांची झोप उडाली आहे. आता पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास पत्रकार परिषद घेत हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करू शकतो असा दावा केला आहे.

दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीय संकल्प आहे. टार्गेट (लक्ष्य), टाईम आणि हल्ला कशा प्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत मांडली. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थान घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी एक ट्विट केले. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी

काय आहे ट्विट?

पाकिस्तानकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की, हिंदुस्थान पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याच्या निराधार आणि बनावट आरोपांच्या बहाण्याने पुढील 24 ते 36 तासांमध्ये पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, असे ट्विट अताउल्लाह तरार यांनी केले आहे. तसेच पाकिस्तान कोणत्याही आक्रमक कारवाईला निर्णायक उत्तर देईल, अशी दर्पोक्तीही तरार यांनी केली.