
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी बऱ्याच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र डार्क हॉर्स अधिकारी बाजी मारणार असे बोलले जात आहे.
सदानंद दाते, संजय वर्मा, संजीव सिंघल, अर्चना त्यागी, रितेश कुमार, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे, प्रभात कुमार व देवेन भारती या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. सद्यस्थितीत हे अधिकारी खात्यात वरिष्ठ असल्याने त्यांच्यापैकी एकाची आयुक्तपदी नियुक्ती होईल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. पण ज्यांच्या नावाची जास्त चर्चा होते त्यांना संधी मिळतेच असे नाही. मुंबई आयुक्तपदासाठी वरिष्ठ महासंचालक पदाचा अधिकारीच हवा असेही काही नाही. त्यामुळे सरकारची कृपादृष्टी ज्यांच्यावर आहे तोच अधिकारी आयुक्त पदावर बसतो. नावे अनेक अधिकाऱ्यांची चर्चेत असली तरी डार्क हॉर्स अधिकारी यात बाजी मारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
n सदानंद दाते हे सध्या एनआयएचे प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपास एनआयए करत आहे. तर अर्चना त्यागी, संजय वर्मा हे बराच कालावधी साईड पोस्टिंगला आहेत. रितेश कुमार होमगार्डचे महासंचालक असून यांना ज्युनियर असलेले आशुतोष डुंबरे हे ठाणे पोलीस आयुक्त, देवेन भारती सध्या मुंबईचे स्पेशल सीपी आहेत. तेव्हा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.