राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी

दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका, आम्ही कुठल्या मानसिकतेतून जात आहोत याचा माणुसकी म्हणून विचार करा. कुणीही आम्हाला खोटे पाडू नका, अशी विनवणी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

प्रगती जगदाळे म्हणाल्या, स्टेटमेंट करणे सोपे आहे. राजकारण्यांना आम्ही आपले मानतो. त्यांनी तरी असे करू नये. मी अजूनही त्या धक्क्यातच आहे. डोळे बंद केले तरीही रायफल घेतलेला माणूस दिसतो. आठ दिवस झाले मी झोपले नाही. या दुर्घटनेमुळे आमचे जे नुकसान झाले, ते कोणीही भरून काढू शकत नाही. माझी सगळ्यांनाच विनंती आहे. आमच्या भावनांचे राजकारण करू नये. आमचे दु:ख रंगवून सांगू नका. आमचा माणूस आमच्यासमोर मारला आहे. दहशतवादी मारायलाच आले होते. त्यांनी त्वेषाने बोललेली वाक्ये ऐकली आहेत.