पोलीस डायरी – हल्ले कसे रोखणार ? सागरी सीमा खुल्या, बोटी नादुरुस्त!

>> प्रभाकर पवार

22 एप्रिलचा मंगळवार आपल्या देशवासीयांसाठी एक काळाकुट्ट दिवस ठरला. महाराष्ट्रातील हेमंत जोशी (44, डोंबिवली), अतुल मोने (43, डोंबिवली), संजय लेले (50, डोंबिवली), दिलीप देसले (64, पनवेल), संजय जगदाळे (50, पुणे), कौस्तुभ गनबोटे (50, पुणे) या सहा जणांसह 26 पर्यटक कश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले. नीरज उधवानी (33, जयपूर, सीए), बिटन अधिकारी (36, कोलकाता, आयटी अधिकारी), शुभम द्विवेदी (39, कानपूर, व्यावसायिक), टेग हेल यँग (30, अरुणाचल प्रदेश, भारतीय हवाई दल अधिकारी), विनय नरवाल (26, नौदल अधिकारी), मनीष रंजन मिश्रा (41, केंद्रीय गुप्तचर अधिकारी, पश्चिम बंगाल), एन. रामचंद्रन (65, निवृत्त अभियंता, कोची), दिनेश मिरानिया (42, व्यावसायिक, रायपूर), समीर गुहा (46, स्टॅटिस्टिकल अधिकारी, सीजीओ, कोलकाता), जे. एस. चंद्रामौली (68, विशाखापट्टणम), सोमी शेट्टी, मधुसूदन राव (42, अभियंता, बंगळुरू), मंजुनाथ राव (47, व्यावसायिक, कर्नाटक), भारत भूषण (41, अभियंता, बंगळुरू), शैलेश कलाथिया (44, बँक मॅनेजर, एसबीआय, सुरत), सुशील नाथानील (58, एलआयसी बँच मॅनेजर, इंदूर), सय्यद आदिल हुसेन शहा (29, घोडेस्वार, पहलगाम), सुदीप न्यूपेन (27, नेपाळ, विद्यार्थी), प्रशांत सातपॅथी (43, ओडिसा अकाऊंटंट) तसेच मनीष भाई परमार (45, हॉटेल मालक) व त्यांचा 17 वर्षांचा मुलगा सुमीत असे 20 जण पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झाले तर 17 जण जखमी झाले.

पहलगाममधील बैसरन दरीत देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांची कायम गर्दी असते, परंतु या परिसरात सुरक्षा नावाला नसते हे हेरून अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला केला. त्यात स्वच्छंदी, निष्पाप पर्यटकांचे बळी गेले. त्यात एक नौदलाचा, दुसरा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा तर तिसरा हवाई दलाचा अधिकारी होता. विनय नरवाल या नौदल अधिकाऱयाचे तर आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तो हनीमून साजरा करण्यासाठी कश्मीरात गेला होता. कुणी लग्नाचा वाढदिवस तर काही जण आपली मुलं बारावी परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कश्मीरात गेले होते. त्यात कुणी बँक मॅनेजर, कुणी इंजिनीअर तर कुणी व्यावसायिकही होते, दोन अनिवासी भारतीयही होते. परंतु 22 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी सर्व कर्त्या पुरुषांना त्यांच्या बायकामुलांसमोर ठार मारून क्रौर्याची सीमा गाठली. पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱया सय्यद आदिल या घोडेस्वारालाही अतिरेक्यांनी सोडले नाही.

अतिरेकी कुठून आले, कसे आले, याचा गुप्तचर यंत्रणांना थांगपत्ता लागला नाही. कसा लागेल? आपल्या सीमाच उघडय़ा असल्यावर काय? बांगलादेशी नागरिक तर राजरोसपणे हिंदुस्थानात घुसखोरी करीत आहेत. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकांना परत आपल्या देशात पाठविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, परंतु बनावट कागदपत्रं सादर करून एजंटमार्फत आधार आणि पॅनकार्ड मिळविणाऱया बांगलादेशींचे काय?. अशांना हुसकावून लावण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतात, परंतु तुमच्या सीमाच जर सताड उघडय़ा असतील तर? म्हणजे ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असा हा प्रकार आहे. सीमारेषा जोपर्यंत पूर्णपणे सीलबंद केल्या जाणार नाहीत तोपर्यंत घुसखोरी व हल्ले थांबणार नाहीत.

26/11 रोजी मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हाही आपण गाफील होतो. समुद्रातून अतिरेकी कधी कुलाब्याच्या बधवार पार्क समुद्रकिनाऱयावर उतरले हे ना नौदलाला कळले ना आपल्या गुप्तचर यंत्रणांना! पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी ताज, ओबेरॉय, ट्रायडंट हॉटेल, सीएसटी, नरीमन हाऊस तसेच खोल समुद्रात असलेल्या बोटींमध्ये 170 जणांना ठार मारले. त्यात 26 परदेशी नागरिक, 18 पोलीस अधिकारी व जवानांचा समावेश होता. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सागरी सीमा सक्षम करण्यात येतील असे वाटले होते, परंतु मुंबईतील आजही सर्व लॅण्डिंग पॉइंटस् असुरक्षित आहेत. सीसीटीव्ही सोडले तर गस्तीवरील नौका नादुरुस्त आहेत. ज्या दुरुस्त आहेत त्या चालविण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ नाही. जे अंमलदार आहेत ते निवृत्तीकडे झुकलेले आहेत, त्यांना बोट चालविण्याचे सोडा, बोटीत चढताही येत नाही. मग का नाही
पाकिस्तान हल्ला करणार?

पाकिस्तानने हिंदुस्थानबरोबर छुपे वॉर सुरू केले आहे. पठाणकोट, उरी, पुलवामा येथे लष्करी, निमलष्करी जवानांवर हल्ले केल्यानंतर भारताने पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोट येथील अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर 2019 साली हल्ला केला. त्यानंतर पाकचे हल्ले थांबतील असे वाटले होते; परंतु ते थांबले नाहीत. उलट ते वाढले आहेत. आता तर अतिरेक्यांनी पर्यटकांनाच लक्ष्य केले आहे. सुरक्षेतील चुका, उणिवा (Security Lapses) वाढल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान मोठय़ा प्रमाणात ड्रगचा साठा समुद्रमार्गे गुजरातला पाठवीत आहे. 15 दिवसांपूर्वीच कांडला बंदराजवळ 1 हजार 800 कोटी रुपयांचा ड्रगचा साठा पकडण्यात आला; परंतु सुरक्षा यंत्रणा भेदून आज हजारो कोटी रुपयांचा ड्रगचा साठा भारतात रोज येत आहे. मुंबईसारख्या शहरातील तरुण पिढी बरबाद केली जात आहे. याच पैशांतून अतिरेकी गब्बर होत आहेत. शस्त्र्ाs विकत घेत आहेत. आपल्या भारतीय जवानांवर, पर्यटकांवर हल्ले करून आपल्या देशात स्थानिक गद्दारांच्या मदतीने अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांडला व मुंद्रा ही गुजरातमधील बंदरे अतिरेक्यांच्या ‘सोयी’ची झाली आहेत. तेथील सागरी सुरक्षा खोखला झाली आहे.

मुंबईत 26/11 रोजी भीषण हल्ला होऊन आज 17 वर्षे लोटली तरी अजूनही सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यात आलेली नाही. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आलेल्या पेट्रोलिंग बोटी नादुरुस्त आहेत. तेव्हा जनहो सावधान, तुमचे रक्षण तुम्हीच करू शकता. पोलीस नाहीत! आज त्यांच्याच जीवाचे खरे नाही. तेव्हा कुणी गाफील राहू नका! गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, रात्र वैऱयाची आहे हे लक्षात ठेवा!