
पलहगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू-कश्मीरमधील जवळपास 87 पैकी तब्बल 50 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कश्मीर खोऱयात अतिशय संवेदनशील ठिकाणी असलेली पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा मोठा निर्णय ओमर अब्दुल्ला सरकारने घेतला आहे.
विविध ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन बंद करण्यात आलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत आणखी काही पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱयांनी दिली आहे. ज्या पर्यटनस्थळांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे ती पर्यटनस्थळे खुली ठेवण्यात आल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. जरी जम्मू-कश्मीरमधील संबंधित प्राधिकरणाने याबाबतची अधिकृत सूचना जारी केलेली नसली तरीही संबंधित पर्यटनस्थळांची ठिकाणे बंद करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱयांनी सांगितले.
या पर्यटनस्थळांचा समावेश
मुघल गार्डन, अनंतनाग येथील वेरीनाग, बंगस खोरे, युसमार्ग रिसोर्ट, दुथपथरी, कोरेरनाग, दक्सम, सिंथन टॉप, अच्चाबल, मार्गन टॉप, गुरेझ आणि तोसामैदान, शोपियाँ येथील उंचावरील काwसरनाग तलाव, उरी येथील कमान चौक, श्रीनगर शहरात मध्यभागी असलेली जामिया मशीद अशी अत्यंत संवेदनशील ठिकाणी असलेली ठिकाणे बंद करण्यात आल्याचे जम्मू-कश्मीर प्रशासनाने म्हटले आहे.
– मुघल गार्डनसह अनेक उद्यानांचे गेट बंद करण्यात आले असून त्यांना टाळे लावण्यात आले आहे. येथे सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून आहे. अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तुरळक गर्दी आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ‘4PM’युटय़ूब चॅनेल ब्लॉक
73 लाख सबस्क्रायबर्स असणारे ‘4 पीएम’ हे युटय़ुब न्यूज चॅनेल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत केंद्र सरकारने बंद केले आहे.