हल्ल्याचा मास्टरमाईंड पाक सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या दहशतवाद्यांची कुंडली काढली जात असून या दहशतवाद्यांची नावेही उघड झाली आहेत. त्यानुसार पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसा असून तो पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर असल्याची माहिती मिळाली आहे. मूसा हा सध्या पाकिस्तानी सैन्यात स्पेशल फोर्समधील माजी पॅरा कमांडो आहे. त्यामुळे त्याला लपून बसण्याचे सर्व डावपेच माहिती आहेत. पाकिस्तानी सैन्यात असताना त्याला चांगल्या पद्धतीने ट्रेन करण्यात आले असावे. त्यामुळेच रेकी करून आणि संपूर्ण कट रचून त्याने हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मूसा हा हिंदुस्थानी लष्कराच्या हाती लागल्यास पाकिस्तानचे पितळ आणखी उघडे पडू शकते.