
गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या मुंबईचा प्रवास छायाचित्रकार आशीष राणे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपला आहे. त्यांच्या याच वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या 2 मेपासून प्रेस क्लबमध्ये मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. ‘मुंबई फ्रॉम अबोव्ह’ असे या प्रदर्शनाचे नाव असून शहराची विहंगम दृश्ये छायाचित्रकार आशीष राणे यांनी विविध भागांतून टिपली आहेत. ही केवळ उंचावरून टिपलेली छायाचित्रे नसून गेल्या काही दशकांत मुंबईचा उंचीपूर्ण विकास कसा होत गेला याचा घेतलेला वेध आहे. जुन्या मुंबईचे हेरिटेज कल्चर, मुंबईत साकारल्या गेलेल्या आणि जात असलेल्या पायाभूत सुविधा याची अनुभूती या छायाचित्रांतून मिळणार आहे. या प्रदर्शनात त्यातील निवडक 30 छायाचित्रे मांडण्यात येणार आहेत.