ड्रग्ज तस्करीत पोलीस,कस्टम अधीक्षक, हॉकीपटूसह 10 जणांना अटक,नवी मुंबई क्राईम ब्रँचची धडक कारवाई

आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजाच्या तस्करीप्रकरणी नवी मुंबई शहरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी धरपकड केली आहे. ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सहभागी असलेल्या दहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यामध्ये कस्टम विभागाचा अधीक्षक, नवी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी आणि एका हॉकी खेळाडूसह दहा जणांचा समावेश आहे. अटक आरोपींकडून 16 लाख 50 हजारांच्या अमली पदार्थांसह 74 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

तरुणवर्गामध्ये विशेष आकर्षण असलेल्या आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजाच्या तस्करीसाठी काही तस्कर नेरूळ येथील सेक्टर 15 मधील आशीष गवारी याच्या टेरेसवर येणार आहेत अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा रचून छापा मारला असता टेरेसवर अहमद ओलगी, आकाश मौर्या आढळून आले. पोलिसांनी गवारी आणि अहमद यांच्यावर झडप घातली. मात्र मौर्या पळून जाण्यात यशस्वी झाला. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कस्टम विभागाच्या परदेशी टपाल कार्यालयातील अधीक्षक प्रशांत गौर (40), खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन भालेराव, नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षातील पोलीस हवालदार संजय फुलकर, हॉकीपटू सुजित बंगेरा, साहिल लांबे, कमल चांदवाणी, अंकित पटेल आणि रिपुंदकुमार पटेल यांना अटक केली. या आरोपींकडून एक किलो गांजा, 137 गॅम हायड्रो गांजा, दोन ग्रॅम कोकेन, लिक्विड हायड्रो गांजा दोन बॉटल आणि विदेशी अमली पदार्थ हस्तगत केले. पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांची पिंमत सुमारे 16 लाख 43 हजार रुपये असल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या गुह्यात अटक करण्यात आलेले दोन्ही पोलीस हे आरोपींच्या गेल्या सहा महिन्यांपासून संपका&त होते.