
>> सु. ल. हिंगणे
मुहूर्तशास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय अथवा अंत न होणारा. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते ते अक्षय्य असतं अशीही एक कल्पना आहे. अक्षय्य तृतीया ही इतरत्र ‘अखा तीज’ नावाने लोकप्रिय आहे. याच दिवशी वेद व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत सांगण्यास सुरुवात केली होती. सागराकडून जमीन मिळवणाऱया परशुरामाचा जन्मदिवस असल्याने गोव्यात आणि कोकणपट्टीत या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
निर्सगाप्रतिचे ऋण दर्शवणारे आणि समाजातील परात्मभाव संपवून एकात्मभाव वाढीस लागावा यासाठीची मूल्यपेरणी करणारे भारतीय सण व त्यातील परपंरा या पूर्वजांनी किती खोल विचार करून केल्या होत्या याची साक्ष देतात. बरेचसे सण भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत निरनिराळ्या नावाने ओळखले जातात आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यामागचे विचारसूत्र समान आहे. हिंदू कालगणनेप्रमाणे वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला येणारा अक्षय्य तृतीया हा सणही असाच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे मुहूर्तशास्त्रामध्ये वर्षभरातील जे साडेतीन शुभमुहूर्त सांगितले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय हा शब्द संस्कृतमध्ये ज्याचा क्षय अथवा अंत होत नाही. म्हणून या दिवशी ज्याची सुरुवात होते ते अक्षय्य किंवा अंतहीन असतं अशीही एक कल्पना आहे.
भारतभर हा दिवस विविध स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी कोणतंही शुभकार्य करण्यासाठी पंचांग किंवा मुहूर्त पाहावा लागत नाही. नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वास्तूखरेदी अशा कोणत्याही गोष्टीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला सोनेरी दिवस असं म्हटलं जातं. कारण वर्षभरातला हा सोनं खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. हिंदू धर्मात सोन्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. सोन्याची पूजाही केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं जास्त पवित्र मानलं जातं. त्यामुळं सोन्याचे भाव कितीही असले तरी या दिवशी किमान गुंजभर तरी सोनं खरेदी करावं. ज्यांना सोनं शक्य नाही त्यांनी चांदी खरेदी करावी.
अक्षय तृतीया ही इतरत्र ‘अखा तीज’ नावाने लोकप्रिय आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱया तिथीला येणाऱया दिवसाला अक्षय्य तृतीया असं संबोधलं जातं. परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. परशुरामांना भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानलं जातं. या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला आणि याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा धरतीवर अवतरली अशीही एक मान्यता आहे.
अक्षय्य या शब्दाचा अर्थच कायमस्वरूपी, दीर्घायुषी असा आहे. त्यामुळे या दिवशी जर सोनं, चांदी, हिरे, मोती किंवा स्थावर संपत्तीची खरेदी केली तर त्यात नेहमी वाढ होत राहते असा विश्वास आहे. या दिवसाला ‘नवना पर्वम’ असंही संबोधलं जातं आणि रोहिणी नक्षत्रात आलेला हा दिवस जास्तच पवित्र मानला जातो.
असं समजलं जातं की, याच दिवशी वेद व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत सांगण्यास सुरुवात केली होती. सागराकडून जमीन मिळवणाऱया परशुरामाचा जन्मदिवस असल्याने गोव्यात आणि कोकणपट्टीत या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बरेच जण उपवास करतात. तसेच या तिथीला गंगेत स्नान करणंही अत्यंत पवित्र मानलं जातं.
हा काळ अत्यंत शुभ मानला जात असल्यानं या दरम्यान जपजाप्य, दानधर्म, पूजाअर्चा, तप, पवित्र स्नान, होमहवन अशा गोष्टी केल्या जाव्यात. थोडक्यात अधिकाधिक पुण्यकर्म करण्याचा हा काळ आहे. उत्तर भारतात या दिवशी केदारनाथ, बद्रीनाथ आणि चारधाम मंदिरं भाविक यात्रेकरूंसाठी खुली केली जातात. भगवान विष्णू आणि कुबेराच्या सन्मानार्थ या दिवशी बरेच जण दिवसभराचा उपवास करतात. उत्तर भारतातही या दिवशी अन्नपदार्थांचं आणि फळांचं दान करण्याचा प्रघात आहे. जाट धर्मियांत हा दिवस ‘अखा तीज’ या नावाने साजरा केला जातो. परंपरेनुसार या दिवशी घरातला कर्ता पुरुष भल्या पहाटे शेतीची अवजारं घेऊन शेतावर जातो. शेतावर जाताना त्याचा सामना शेत खाणाऱया पक्षांशी किंवा जनावरांशी झाला तर ते वर्ष पीकपाण्यासाठी आणि पावसासाठी शुभ मानलं जातं.
व्यापारी वर्गात या दिवसाचं महत्त्व आहे. कोणताही नवा व्यापारउद्योग सुरू करायचा असेल तर या दिवसाची निवड केली जाते. ‘पोईला बोईसाख’ (वैशाखातला पहिला दिवस) हा दिवस बंगाली समाजात खूपच पवित्र मानला जातो. या दिवशी तिकडे ‘हलकता’ (नवीन व्यापार चोपडी पूजा) करण्याची प्रथा आहे. या वेळेस गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.
ओडिशामध्ये हा दिवस शेतीशी संबंधित महत्त्वाचा मानला जातो. तेथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भल्या पहाटे शेतकरी आंघोळ करून नवे कपडे परिधान करतो आणि नव्या टोपल्यांतून बियाणं घेऊन शेतावर जातो. लक्ष्मीची विधीवत पूजा झाल्यानंतर याची पेरणी केली जाते आणि लक्ष्मीमातेला भरघोस पिकाबद्दल विनवलं जातं. संध्याकाळच्या वेळेस सर्व घरांतून संपूर्णपणे शाकाहारी भोजन बनविण्याची परंपरा आहे. पश्चिम ओडिशात हा दिवस ‘मुठी च्चुना’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय या दिवशी हिरव्या पालेभाज्या जेवणात असणं बंधनकारक आहे. भगवान जगन्नाथाच्या सुप्रसिद्ध चंदनयात्रेचा प्रारंभ या दिवशीच होतो.
दक्षिण भारतात या दिवशी इतर ठिकाणांप्रमाणेच भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि लक्ष्मी कुबेर होम केला जातो. काही जण या दिवशी लक्ष्मीपूजनही करतात. विविध मंदिरांना भेटी देऊन गोरगरीबांना दान करण्याची प्रथा आहे.
जैन धर्मातही या दिवसाचं महत्त्व मानलं जातं. असं मानलं जातं की, जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेवजी यांनी त्यांचा तप या दिवशी उसाचा रस घेऊन संपविला होता. जैन धर्मीय या दिवशी त्यांचा उपवास एखाद्या जैन तीर्थ स्थळी जाऊन समाप्त करतात. काही जैन लोकांच्या मते, अक्षय्य तृतीया श्रमण संस्कृतीच्या सुरुवातीची आठवण करून देते, जी भगवान आदिनाथ यांच्या शिकवणीनुसार आहे.
राजस्थानातही हा दिवस ‘अखा तीज’ नावाने ओळखला जातो. या दिवशी अनेक राजस्थानी समाजांत लग्नं करण्याची प्रथा आहे. हा दिवस लग्नासाठी अत्यंत योग्य समजला जातो.
अक्षय्य तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडय़ा इत्यादी वाढतात. सुगंधीत पाण्याने भरलेला घट दान केला जातो. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
एकूणच या सणाशी निगडित विविध प्रथा-परंपरांचा वेध घेतला असता त्यामध्ये पुण्यकर्म आणि दानकर्म यांना अधिक महत्त्व असल्याचे दिसते. एकाकडे ‘न संपणारे पुण्य’ आहे, तर दुसरीकडे ‘स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांना काहीतरी देण्याची वृत्ती’. या दोन्हींचा संगम म्हणजेच सांस्कृतिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग. हाच अक्षय्य तृतीयेचा गर्भितार्थ आहे.
(लेखक अध्यात्म अभ्यासक आहेत)