Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. या 26 लोकांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देश आणि राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध एकत्र आहेत. दहशतवाद्यांवर आणि त्यांचा मालक पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी केली जात. याचदरम्यान, आता काँग्रेस पक्षाने पहलगाम हल्ल्याबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक हिंदुस्थानी संतापला आहे. या महत्त्वाच्या वेळी हिंदुस्थानने दाखवून दिले पाहिजे की, आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत. विरोधी पक्षांना असा विश्वास आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जिथे लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढनिश्चय दाखवू शकतील. आमची विनंती आहे की, विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्यात यावे.”