
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. आता हिंदुस्थानने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहे. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील माहिती पसरवल्याबद्दल देशभरात एकूण 63 दशलक्ष सबस्क्राइबर असलेल्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ख्वाजा यांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार सरकारने यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालय बीबीसीच्या रिपोर्टिंगवर लक्ष ठेवणार आहे. डॉन न्यूज, इर्शाद भट्टी, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उजैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, असमा शिराजी, मुनीब फारूख, एसयूएनओ न्यूज आणि रझी नामा हे यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना हिंदुस्थानच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करून हिंदुस्थानविरोधात अपप्रचार आणि निराधार आरोप केल्याबद्दल तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी समर्थनाच्या इतिहासाबद्दल आसिफ यांच्या कबुलीजबाबाचा संदर्भ दिला. भारताविरुद्ध अपप्रचार करणे आणि निराधार आरोप करणे पाकिस्तानकडून सुरू आहे. मात्र, जगभरात ख्वाजा आसिफ यांनी अलिकडच्या टेलिव्हिजन मुलाखतीत दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल केल्याचे म्हटले आहे, असे पटेल यांनी सांगितले.