
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाला हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा समजला असून लष्कराने या भागाला घेराव घातला आहे. तसेच या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले असल्याने लवकरच दहशतवाद्यांचा खात्मा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचा पुरावा मिळाला आहे. मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे आणि तो स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे. हाशिम मुसाने पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) कडून विशेष प्रशिक्षण घेतले आणि तो लष्कर-ए-तैयबामध्ये सक्रिय झाला. त्याला जम्मू आणि काश्मीरबाहेरील नागरिक आणि पर्यटकांवर हल्ला करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने सलग पाचव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याने जम्मू जिल्ह्यातील अखनूर सेक्टरला लक्ष्य करून गोळीबार केला. पाकिस्तानने प्रथम उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमधील नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवर लहान शस्त्रांचा विनाकारण गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि नंतर पूंछ सेक्टर आणि नंतर अखनूर सेक्टरला लक्ष्य करून उल्लंघनाचा विस्तार केला.