कॅनडातील ओटावामध्ये सापडला ‘आप’ नेत्याच्या मुलीचा मृतदेह, अनेक दिवसांपासून होती बेपत्ता

कॅनडाची राजधानी ओटावामध्ये एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. ही विद्यार्थिनी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेपत्ता होती आणि आता तिचा मृतदेह ओटावा बीचजवळ सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या विद्यार्थिनीचे नाव वंशिका सैनी (21) असे आहे. वंशिका ही आम आदमी पक्षाचे नेते दविंदर सैनी यांची मुलगी आहे. वंशिका शिक्षणासाठी हिंदूस्थानातून कॅनडाला आली होती. ती ओटावा येथील एका शैक्षणिक संस्थेत शिकत होती. दरम्यान 25 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता भाड्याने खोली शोधण्यासाठी वंशिका घराबाहेर पडली. यानंतर ती परतलीच नाही. तिचा फोनही बंद होता. ती परीक्षेलाही बसली नाही. अनेक दिवसांपर्यंत तिचा कोणताही पत्ता न लागल्यामुळे तेथील स्थानिक समुदाय आणि पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली.

चौकशीदरम्यान, मंगळवारी, पोलिसांना ओटावा बीचजवळ एक मृतदेह आढळला. यानंतर चौकशीदरम्यान हा मृतदेह वंशिकाचा असल्याचे आढळून आले. याविषयी हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाने एक पोस्ट शेअर करत या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. “ओटावा येथे हिंदुस्थानी विद्यार्थिनी वंशिकाच्या मृत्यूची बातमी कळताच आम्हाला खूप दुःख झाले आहे. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले आहे आणि स्थानिक पोलिसांकडूनही चौकशी सुरू आहे. आम्ही शोकाकुल कुटुंब आणि स्थानिक समुदायाच्या जवळच्या संपर्कात आहोत.”, असे त्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

पोलिसांनी अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. सध्या पोलिसांकडून सर्वोतोपरी तपास केला जात आहे. प्राथमिक तपासणीत शरीरावर मारहाणीचे कोणतेही निशान आढळले नाहीत, अशी माहिती मिळत आहे. या घटनेमुळे कॅनडामधील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांत कॅनडामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक दुःखद घटना घडल्या आहेत, ज्यात हिंसाचार आणि संशयास्पद मृत्यूंचा समावेश आहे. हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी हिंदुस्थानी समुदाय आणि विद्यार्थी संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.