
ठाण्यात अजब गजब घटना घडली असून चक्क विहीर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी विकासकाकडून विहीर बुजवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. बांधकामासाठी ही विहीर बुजवण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे बांधकामांच्या आड चक्क नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजवले जात आहेत. नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकृष्ण हाऊसिंग सोसायटी या परिसरात बांधकाम सुरू आहे. मात्र ज्या विकासकाकडून हे बांधकाम सुरू आहे त्याने या ठिकाणी असलेली विहीर परस्पर बुजवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कोणत्याही विकासकाला परस्पर विहीर बुजवण्याचा अधिकार नाही. ही विहीर जाणीवपूर्वक बुजवून निसर्गाची हानी केली आहे असा आरोप युवासेनेचे कोलबाड विभागीय समन्वयक अक्षय करंजकर यांनी केला आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेने त्वरित पाहणी करून संबंधित विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी अशी लेखी तक्रार करंजकर यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
विहिरी जतन करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. बहुतांश गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात यापूर्वी असलेल्या अनेक विहिरी विकासकांच्या माध्यमातून बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या विहिरी जतन करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असून याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.