
चार वर्षीय चिमुरड्यावर स्कूल बसचालकाने अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकाला गुन्ह्यात सहआरोपी करा, अशी मागणी करीत संतप्त पालकांनी आज दिल्ली पब्लिक स्कूलवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो पालक सहभागी झाले होते. शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्याध्यापकाच्या या वर्तनाचा निषेध करण्यासाठी आज एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही.
सीवूड येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुरड्यावर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरी सांगितल्यानंतर पालकांना धक्का बसला. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. मात्र वशिष्ठ यांनी स्कूल बसचालकावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकांनी थेट एनआरआय पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल झाला एनआरआय पोलिसांनी दोनच तासांत नराधम स्कूल बसचालकाला अटक केली. मात्र हा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक वशिष्ठ यांनी दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेवर धडक दिली. पालकांच्या या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. शाळेच्या गेटवर येणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिल्ली पब्लिक स्कूल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
मेडिकल टेस्ट विलंबाने केली
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलाला मेडिकल टेस्टसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र त्या दिवशी मेडिकल टेस्ट करण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी बोलावून मेडिकल टेस्ट करण्यात आली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली आहे. तसेच आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी केली आहे.