Summer Tips- उन्हामुळे टॅनिंग झालेल्या हातांना द्या नवसंजीवनी.. करा हे घरगुती उपाय टॅनिंग होईल झटक्यात दूर

उन्हाळा आणि त्वचेवरील टॅनिंग हे काही आपल्याला नवीन नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हातापायांवर सर्वात जास्त प्रमाणात टॅनिंग होते. खासकरुन या टॅनिंगमुळे त्वचेची जळजळ आणि त्वचेवर घामोळ्यांचे प्रमाण वाढते. म्हणूनच उन्हाळ्यातील या टॅनिंगवर उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. मुख्य म्हणजे हे साधेसोपे उपाय आपण अगदी घरच्या घरी करु शकतो. घरगुती उपाय केल्यामुळे, आपल्या खिशालाही खर्च येणार नाही. तसेच आपल्याला अगदी घरबसल्या टॅनिंगपासून मुक्ती मिळेल.

टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय

तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी
साहित्य- 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा गुलाबजल
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी एकत्र करा. आता हे मिश्रण हातांच्या त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की मिश्रण सुकले आहे. नंतर साध्या पाण्याने हात धुवा. लक्षात ठेवा की हा घरगुती हॅण्ड पॅक हातात लावल्यावर हातांची हालचाल करु नका.

पपई आणि मध


साहित्य- 1टीस्पून पपईची पेस्ट, 1/2 टीस्पून मध
पपईची पेस्ट आणि मध मिसळून घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण हातावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर आपले हात धुवा.
फायदे- पपईमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. तर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

 

मुलतानी माती आणि गुलाबजल

मुलतानी माती ही त्वचेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्वचेच्या टॅनिंगवर मुलतानी माती इतका प्रभावी कुठलाही उपाय नाही. मुलतानी माती आणि गुलाबजल एकत्र मिसळून त्याची दाटसर पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून किमान 15 ते २0 मिनिटांनी हा पॅक धुवावा. यामुळे टॅनिंग मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते.

फायदे- मुलतानी मातीमुळे त्वचेला तजेला येतो. तर गुलाबजलामुळे चेहऱ्यावर थंडावा प्राप्त होतो, तसेच यामुळे चेहऱ्यावर लालसर चट्टेही उमटत नाहीत.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)