
केंद्र सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत जव्हार तालुक्यात 11 हजार 486 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. घराचा पहिला हप्ता बँकेत जमा झाला आहे. मात्र जव्हार येथील स्टेट बँकेतून पैसे काढल्यानंतर नोटांच्या बंडलात एक ते दोन नोटा कमी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचारीच बंडलमधील नोटा काढून घपला पाडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
स्टेट बँकेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत बँकेचे उर्मट कर्मचारी घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप होत आहे. दोनशे रुपयांच्या बंडलात 2 नोटा तर शंभरच्या बंडलात एक नोट कमी असल्याचा प्रकार 12 लाभार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे. याबाबत घरकुल लाभार्थ्यांनी बँकेत तक्रार केली असता कर्मचाऱ्यांनी हात वर करत काऊंटर सोडण्यापूर्वी पैसे मोजणे गरजेचे असल्याचे शहाणपण गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना शिकवले.
जव्हार स्टेट बँकेतून घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या नोटांच्या बंडलात नोटा कमी गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शहानिशा होऊन सखोल चौकशी करण्यात येईल. – गणेश बोधक, व्यवस्थापक, स्टेट बँक.