रायगड जिल्ह्यात गावठी दारूचा ‘पूर’, 7 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

रायगड जिल्ह्यात जंगल आणि खाडीकिनारी गावठी दारूच्या भट्टया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात या भट्टयांवर धडक कारवाई करून सुमारे 2 हजार 457 गुन्हे दाखल केले. या कारवाईत 7 कोटी 36 लाख 86 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असला तरी जिल्ह्यात गावठी दारूच्या भट्ट्या कमी झालेल्या नाहीत. बहुतेक गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत.

1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई करत 7 कोटी 36 लाख 86 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विदेशी तसेच गावठी दारू, त्यासाठी लागणाऱ्या रसायनांसह वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांचाही त्यात समावेश आहे. यादरम्यान उत्पादन शुल्क विभागाने 2 हजार 457 गुन्हे दाखल करत 2 हजार 204 जणांना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी 2 हजार 116 गुन्ह्यांची उकल झाली आहे. 341 गुन्ह्यांची उकल करण्यात अपयश आले आहे. अवैध दारूच्या धंद्यातून प्रचंड कमाई होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

विदेशी दारू नष्ट केली
राज्य उत्पादन शुल्क अवैध दारू धंद्यांविरोधात कारवाई करत सुमारे कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करते. मात्र जप्त केलेला मुद्देमाल त्यातील विदेशी मद्य, रसायन, गावठी मद्य हे पिण्यालायक राहत नसल्याने किंवा ते घातक असण्याची शक्यता गृहित धरून नष्ट केले जाते. त्यामधून जे भंगार जमा होते, ते मिळेल त्या भावात विकले जाते. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात 7 कोटी 36 लाख 86 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तरीही त्याची किंमत प्रत्यक्षात काही लाखांच्या घरात आहे.