राज्यात उष्माघाताचे 70 रुग्ण; पुण्यातील एकाचा समावेश

राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 70 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक 11 रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात असून, पुण्यातही एका रुग्णाची नोंद झाली आहे. सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने जनजीवन होरपळून निघत आहे. कमाल तापमानाने 40 अंशांचा पारा केव्हाच ओलांडला असून, तो बहुवंशी शहरात गेल्यापासून दिवसांपासून स्थिरावला आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात उष्माघाताच्या 70 रुग्णांची नोंद केली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या आसपास स्थिरावला आहे. आज दुपारी सूर्य आग ओकत होता, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर फिरणेदेखील मुश्कील झाले होते. उन्हाच्या चटक्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली होती. पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातदेखील कमाल तापमानाच्या पाऱ्याने 45 अंशांचा टप्पा गाठला आहे. आज राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद अकोला येथे 44.5 अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान, मराठवाड्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.