नवी मुंबई पोलीस-ड्रग्जमाफिया कनेक्शन, दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर झडप

बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केल्यानंतर ड्रग्ज तस्करांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमुळे नवी मुंबई पोलीस आणि ड्रग्जमाफिया यांचे कनेक्शन उघड झाले आहे. चिंचकर यांच्या मुलाला ड्रग्ज तस्करीत मदत करणाऱ्या खारघर पोलीस ठाण्यातील संजय फुलकर आणि अमली पदार्थविरोधी शाखेतील सचिन भालेराव या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.

बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांचा मोठा मुलगा नवीन चिंचकर ड्रग्जचे सिंडिकेट चालवतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत 200 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज नवीन चिंचकर आणि असल्याचा आरोप पोलिसांनी करून त्यांचे वडील गुरुनाथ चिंचकर यांची चौकशी सुरू केली होती. या चौकशीला कंटाळून गुरुनाथ यांनी बेलापूरमधील आपल्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीने गेले दोन दिवस सखोल तपास करून गुरुनाथ यांच्या मुलांच्या संपर्कात असलेल्या संजय फुलकर आणि सचिन भालेराव या दोन्ही पोलिसांची उचलबांगडी केली आहे. हे दोघेही चिंचकर यांच्या मुलाच्या संपर्कात होते. तसेच त्यांना हा गोरखधंदा चालवण्यासाठी मदत करीत होते, असे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आणखी पोलिसांचा समावेश
नवीन चिंचकर चालवत असलेल्या ड्रग्ज सिंडिकेटमध्ये नवी मुंबईतील आणखीही काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सहभागी असलेले अन्य पोलीस आणि ड्रग्ज तस्करांची धरपकड करण्यासाठी एसआयटीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

नशामुक्त नवी मुंबईला सुरुंग
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘नशामुक्त नवी मुंबई या अभियानाला विशेष प्राधान्य दिले. ड्रग्ज पेडलरचे कंबरडे मोडण्यासाठी कारवाईची धडक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मात्र आयुक्तांच्या या ‘नशामुक्त नवी मुंबई’ या अभियानाला पोलीस दलातील संजय फुलकर आणि सचिन भालेराव यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांमुळे सुरुंग लागला आहे.