
‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी’ अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे ‘प्रति तुळजापूर’ मंदिर नव्या रूपात ठाण्यात उभारण्यात आले आहे. गणेशवाडी-पाचपाखाडी येथे उभारण्यात आलेल्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर होणार आहे. या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एका धार्मिक स्थळाची भर पडणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची काही वर्षांपूर्वी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. कालांतराने मंदिर जीर्ण होत चालले होते. शिवाय भविष्यातील वाढणारी वाहतूक पाहून रस्त्यामध्ये हे मंदिर असल्याने आव्हाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.
कायदेशीर बाबींची पूर्तता
नवीन मंदिर उभारण्यासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे पालिकेकडून मिळविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हे वास्तुविशारद संजय बोबडे यांनी तयार केलेला मंदिराचा आराखडा मंजूर करून घेण्यात आला.