
<<< प्रभा कुडके >>>
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरचा चेहरामोहरा बदलला. एका भ्याड हल्ल्याच्या घटनेने कश्मीरमधल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत्याचे नव्हते झाले. पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर कश्मीरचे धुमसते दहशतवादाचे विक्राळ रूप समोर आले. गेल्या 21 वर्षांतला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे इथल्या मुख्यमंत्र्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या हल्ल्याचे पडसाद कश्मीरच्या अंगाखांद्यावर अधिक काळ राहणार यात शंकाच नाही. खोऱ्याच्या प्रत्येक भागात भयाण शांतता आणि सुतकी वातावरण आहे. कश्मीर खोरे पुन्हा पर्यटकांनी गजबजणार की नाही, अशीच शंका इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात कश्मीर भेटीमध्ये दिसून आली.
कश्मीरचा सर्व आर्थिक डोलारा हा पर्यटकांवर अवलंबून असल्याने हल्ल्यानंतर कश्मीरचे आर्थिक नुकसान होणे हे सहाजिकच होते. गेल्या चार वर्षांत कश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने खोऱ्यात एक आश्वासक वातावरण निर्माण झाले होते. हिंदुस्थानसह परदेशातील पर्यटकांनाही कश्मीरच्या सौंदर्याची भुरळ होती. देशाच्या विविध भागांतून कश्मीरला भेट देणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये महाराष्ट्रातून, गुजरातमधून कश्मीर पर्यटनाला सर्वाधिक गर्दी करणारे पर्यटक हल्ल्यानंतर अचानक कमी झाले. काहींनी बुकिंग रद्द केली, तर काहींनी दुसऱ्या ठिकाणी जाण्याला प्राधान्य दिले.
एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यांत लाखोंनी पर्यटक कश्मीरला भेट देतात. झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे कश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादाचे भयाण वारे वाहू लागलेत. कश्मीर खोऱ्यातील छोट्यामोठ्या गावासोबत, इथले रस्ते, शिकारे, हाऊसबोट, हॉटेल्स सर्व ओस पडलेले दिसून आले. इथला प्रत्येक नागरिक हा पर्यटनाच्या साखळीमध्ये जोडला असल्याने, स्थानिकांच्या चेहऱ्यावर उपासमारीची चिंता अगदी स्पष्ट दिसून येत आहे.
पूर्वपदावर येण्यासाठी किमान 7 ते 8 महिने लागणार
कश्मीरच्या भेटीत हॉटेलचालक, मालक, शिकारा चालक, स्थानिक नागरिक, ड्रायव्हर यांच्यासोबत संवादात केवळ एकच गोष्ट कानावर आली. आता हे लवकर पूर्वपदावर येणार नाही. कश्मीरला पूर्वपदावर यायला किमान 7 ते 8 महिने लागतील असे इथले जाणकार म्हणतात. असे असले तरी तुरळक पर्यटक मात्र आजही कश्मीरमध्ये आहेत. कश्मीरच्या लाल चौकातील गर्दीमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथले कश्मिरी प्रश्न विचारू लागले आहेत. आमच्याबद्दल काही दाखवताना विचार करा, आमच्या पोटावर पाय येईल असे वागू नका असे सांगत आहेत.
कश्मीरींचे पर्यटकांच्या वाटेकडे डोळे
स्थानिकांच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊच शकत नाही या विधानांना दबक्या आवाजात का होईना इथल्या सुजाण नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. मेहमान नवाजीसाठी प्रसिद्ध असलेले कश्मिरी सध्या एक झलक पर्यटकांची दिसावी म्हणून आसुसलेले आहेत. कश्मीरच्या सौंदर्याच्या मुकुटमण्याला दहशतवादाचा डाग पुन्हा एकदा लागलाय. दहशतीच्या भयामुळे इथला स्थानिक हवालदिल झालाय. खोऱ्यातील हा दहशतीचा डाग इतका गडद आहे की तो इतक्या सहजासहजी मिटणार नाही हेच खरे.