
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली. एनआयएच्या विनंतीवरून पतियाला न्यायालायने राणाच्या कोठडीत वाढ केली. न्यायालयाने यापुर्वी त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यानंतर कडक सुरक्षेत राणाला विशेष एनआयए न्यायाधीश चंदरजीत सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आले.
एनआयएने राणाच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा असल्याचे न्यायालयाला सांगितले आणि आणखी 12 दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी पुढील चौकशीसाठी एनआयए कोठडीत वाढ केली. दरम्यान, 10 एप्रिल रोजी राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून हिंदुस्थानात आणले गेले. त्यानंतर रात्री उशिरा पतियाला न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती.