
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि बसित अली यांच्या यूट्यूब चॅनेलवर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सरकारच्या आदेशानुसार हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय अन्य 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सना सरकारने दणका दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल प्रक्षोभक, खोटे आणि दिशाभूल करणारी कथा तसेच हिंदुस्थान, लष्कर आणि सुरक्षा एजन्सीविरुद्ध चुकीची माहिती प्रसारित करत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले.
पाकिस्तानमधील डॉन न्यूज, इर्शाद भाटी, साम टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, राफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्टस्, जीएनएन, उझैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराझी, मुनीब फारूक, सुनो न्यूज आणि राझी नामा या 16 यूट्यूब चॅनेलवर हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे.
अतिरेकी नव्हे दहशतवादी; बीबीसीच्या कव्हरेजवर आक्षेप
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या कव्हरेजवर सरकारने तीव्र आक्षेप घेत कंपनीचे हिंदुस्थानातील प्रमुख जॅकी मार्टिन यांना पत्र लिहिले. ‘कश्मीर हल्ल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानींचा व्हिसा रद्द केला’ या शीर्षकाच्या लेखात बीबीसीने दहशतवादी हल्ल्याचे वर्णन ‘अतिरेकी हल्ला’ असे केले होते. मार्टिन यांना लिहिलेल्या पत्रात परराष्ट्र मंत्रालयाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजवर देशाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच दहशतवाद्यांचे वर्णन ‘अतिरेकी’ असे केल्याबद्दल आक्षेप घेतला. इथून पुढेही बीबीसीच्या वृत्तांकनावर लक्ष ठेवेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.