
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान सरकारने सिंधु जल करार रद्द करत पाच मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली असताना आता पाकव्याप्त कश्मीरमधून पाकिस्तान सरकार विरोधात जनक्षोभ उसळला आहे. खाण आणि खनिज कायदा 2025 विरोधात पीओकेच्या गिलगीट बाल्टीस्तानमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पाकिस्तान सरकारची मनमानी चालू देणार नाही. बलुचिस्तानमधील पर्वत, जमिनी, खनिजे आणि खाणींवर सरकारचा कब्जा नामंजूर… येथील लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ नामंजूर… मालमत्तांवर कब्जा नामंजूर… अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
बलुचिस्तानातील जमिनी, खाणी तसेच विविध संसाधनांवर सरकार बेकायदेशीर नियंत्रण आणत असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. एकीकडे हिंदुस्थान सरकारने सिंधु जल करार रद्द केला असून पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले. त्यानुसार अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी होत आहे. हिंदुस्थानी नौदल आणि हवाई दलाने युद्ध सराव करत सामर्थ्यही दाखवण्यास सुरुवात केली. जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तान सरकारकडून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेचा निषेध होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी जनताही सरकारला कंटाळली असून बलुचिस्तानमध्ये जनतेच्या संतापाचा प्रचंड उद्रेक झाल्याचे चित्र आहे.
बलुचिस्तानातील नागरिकांना सवलती द्या!
बलुचिस्तानातील नागरिकांच्या आयुष्याशी खेळू नका. येथील लोकांच्या संपत्तीवर बेकायदेशीर नियंत्रण आणू नका. लोकांना शांततेत जगू द्या, विविध सवलती द्या अशा मागण्या येथील लोकांच्या आहेत. या मागण्यांसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने केली.