
नेहमी छप्पन इंचाच्या छातीबद्दल बोलता. अरे बाबा बिहार दूर होता का? सर्वपक्षीय बैठकीला आला असता तर दहशतवाद्यांना वेचून मारण्याबद्दल तुमच्या योजना काय आहेत त्या आम्हाला कळल्या असत्या, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. जयपूरमध्ये आयोजित संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते.
हे देशाचे दुर्दैव आहे की जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जात होता, तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणूक भाषण देत होता. सर्व पक्षांचे नेते सर्वपक्षीय बैठकीला आले होते, पण पंतप्रधान त्या बैठकीला आले नाहीत. हे दुःखद आहे. बिहार खूप दूर होता का? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत येऊन योजना स्पष्ट केली असती. तुम्हाला आमच्याकडून कोणती मदत हवी आहे, हे कळले असते, असेही खरगे म्हणाले.
मोदींनी महागाई, बेरोजगारी दिली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवले. म्हणूनच एक साधा चहा विक्रेता पंतप्रधान होऊ शकतो. माझ्यासारख्या गिरणी कामगाराचा मुलगा देशात विरोधी पक्षनेता होऊ शकतो. जर संविधान टिकले तरच तुम्ही पंतप्रधान आणि गृह मंत्री व्हाल, असे खरगे म्हणाले. आजच्या सर्व मोठ्या योजना काँग्रेसचे योगदान आहे. मोदींनी काय दिले? महागाई आणि बेरोजगारी दिली. मोदी 56 इंचाच्या छातीबद्दल बोलतात. आता त्यांची ही छाती आकुंचन पावली आहे, असा टोलाही खरगे यांनी लगावला.