
पलूस तालुक्यातील कुंडल येथील भारती महेंद्र लाड यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या. काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या त्या कन्या होत्या. भारती लाड यांच्यामागे पती रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, मुले ऋषिकेश आणि रोहन, भाऊ आमदार डॉ. विश्वजीत कदम असा परिवार आहे.
दरम्यान, कुंडल येथे हजारोंच्या उपस्थितीत भारती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 14 एप्रिल रोजी चक्कर आल्यामुळे भारती लाड यांना सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची किडनी निकामी झाल्याचे निदान झाले.
पलूस परिसरात अनेक संस्था उभारल्या
घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले, तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिसळून असत. त्यांचा विवाह 3 मे 1993 रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. भारती यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे पलूस परिसरात उभे राहिले.