
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातल्या 19 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून या इमारतींमधील रहिवाशांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्य केली.
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीए, मुंबई महापालिका तसेच एमएसआरडीएचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या परिसरातील सर्व 19 इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता विकास नियंत्रण नियमावली 33(9) अंतर्गत एमएमआरडीने करावा, अशी सूचना बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सूचना मान्य केली.
सरकारच्या नव्या नियोजनानुसार फक्त दोन चाळी बाधित होणार आहेत. मात्र, एकूण 19 इमारतींना धोका निर्माण होईल, अशी रहिवाशांची भीती आहे. त्यामुळे सर्व 19 इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय झाल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. ज्या दोन चाळी पाडाव्या लागणार आहेत त्या दोन्ही चाळींतील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबीरात पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, त्याला रहिवाशांचा विरोध आहे.
अधिक एफएसआय मिळणार?
विकास नियंत्रण नियमावली 33(9) ही मुंबई महापालिका क्षेत्रात समुह पुनर्विकासासाठी(क्लस्टर डेव्हलमेंट) वापरली जाते. या नियमाअंतर्गत अनेक जीर्ण किंवा मोडकळीस आलेल्या इमारती एकत्र करून मोठा भूखंड तयार केला जातो. त्यावर एकत्रित पुनर्विकास योजना राबवता येते. त्यामुळे अधिक एफएसआय मिळवता येतो असे नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्यांना सांगितले.