चर्मकार समाजाच्या ऐक्यासाठी देशात चळवळ उभी करा! धारावीतील महामेळाव्यात बाबूराव माने यांचे आवाहन

चर्मकार, होलार, ढोर, मादिगा, मोची अशा असंख्य जाती-उपजातींमध्ये चर्मकार समाज हा देशात विखुरलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व जाती-उपजातींचे नाते हे चामडय़ाशी आहे तर मग जाती वेगवेगळ्या कशाला? आपण सारे जण एक आहोत. एकी ठेवली तरच सरकारवर दबाव येईल. यासाठी चर्मकार समाजाच्या ऐक्यासाठी देशात चळवळ उभी करा, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव माने यांनी केले.

राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली धारावीमधील मनोहर जोशी महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यव्यापी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी बाबूराव माने बोलत होते. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून फुले, शाहू, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या साहित्यिका आशालता कांबळे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे महासचिव गणेश खिलारे, महिला प्रदेशाध्यक्ष शारदाताई नवले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामभाऊ कदम, रावण गायकवाड, अंकुश कारंडे, सुधीर बामणे, अमर शिंदे, सचिन जाधव, दीपक भोसले, माजी मंत्री सूर्यकांत गवळी, मीरा शिंदे, परशुराम इंगोले, ज्ञानोबा माने, जियालाल जयस्वाल, संभाजी ब्रिगेडचे सुहास राणे, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या वेळी जीवनगौरव पुरस्कारांनी समाजसेवकांचा गौरव करण्यात आला.